टोमॅटो रोप वाढीच्या अवस्थेत रोपांच्या वाढीवर परिणाम करणारे अजैविक घटक कोणते व ते काय परिणाम करतात?
Farmspot AgroShare
टोमॅटो रोप वाढीच्या अवस्थेत रोपांच्या वाढीवर परिणाम करणारे अजैविक घटक खालीलप्रमाणे:
तापमान
▸ टोमॅटो पिकांच्या वाढीसाठी 21० C ते 32० C हे तापमान पोषक असते. जर तापमान 21० C पेक्षा कमी झाले व 32० C वाढले तर टोमॅटो रोपांवर अजैविक ताण येतो. जर तापमान 21० C पेक्षा कमी झाले तर प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा वेग कमी होतो, ज्यामुळे वाढीच्या अवस्थेत रोपांची वाढ खुंटते, आणि जर तापमान 32० C पेक्षा जास्त झाले तर पानांच्या पृष्ठभागावर बाष्पीभवन जास्त होऊन पानांच्या वाट्या होतात. ज्याचा परिणाम असा होतो की रोपांची वाढ खुंटते.
सूर्यप्रकाश
▸ सूर्यप्रकाशाचे प्रमाण व सूर्यप्रकाशाची गुणवत्ता टोमॅटो रोपांच्या वाढीच्या अवस्थेत टोमॅटो रोपांच्या वाढीवर परिणाम करते. जेवढी सूर्यप्रकाशाची गुणवत्ता व सूर्यप्रकाशाचे प्रमाण जास्त तेवढी टोमॅटो रोपांची प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया चांगल्या प्रकारे होते. ज्यामुळे अन्ननिर्मिती चांगल्या प्रकारे केली जाते. व रोपांची शाखीय वाढ चांगल्या प्रकारे होते. त्याउलट सूर्यप्रकाशाचे प्रमाण व गुणवत्ता कमी असेल तर त्याचा थेट परिणाम रोपांच्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवर होतो. ज्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा दर कमी झाल्यामुळे रोपांची वाढ खुंटते.
पाणी
▸ टोमॅटो रोपांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात असणारे पाण्याचे प्रमाण रोपांच्या वाढीवर थेट परिणाम करते. रोपांची मुळे ही कोरड्या मातीतून अन्नद्रव्ये शोषण करू शकत नाहीत, तसेच मुळांच्या कार्यक्षेत्रात जरी जास्त पाणी असेल तरी अन्नद्रव्ये शोषण केले जात नाही. अन्नद्रव्ये व पाणी कमतरतेचा थेट परिणाम रोपांचा प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवर होतो, व त्यामुळे रोपांची वाढ खुंटते. जास्त पाणी झाल्यामुळे अन्नद्रव्ये मुळांच्या कक्षेतून पाण्याबरोबर बाहेर वाहून जातात. ज्यामुळे रोपांची पाने पिवळी पडतात. तर कमी पाण्यामुळे वनस्पतींच्या अंतर्गत पाण्याचा टर्गर दाब कमी होतो. व बाष्पीभवन जास्त होते ज्यामुळे रोपांच्या पानांच्या वाट्या होतात. यासाठी ज्या शेतात, मातीत टोमॅटो रोपांची लागवड करणार आहे ती माती जास्तीत जास्त काळ, वेळ वाफसा स्थितीत असावी.
मातीची गुणवत्ता
▸ मातीची भौतिक गुणवत्ता म्हणजेच पाणी धरून ठेवण्याची क्षमता, मातीचा भुसभुशीतपणा तसेच सेंद्रिय कार्बनचे प्रमाण जमिनीची रासायनिक गुणवत्ता म्हणजे जमिनीचा PH व जमिनीचा EC व जमिनीची जैविक गुणवत्ता म्हणजेच जिवाणूंचे प्रमाण व कार्यक्षमता हे सर्व घटक रोपांच्या वाढीच्या अवस्थेत रोपांच्या वाढीवर थेट परिणाम करतात. ज्यामुळे अन्नद्रव्यांच्या शोषणावर परिणाम होतो. व ज्यामुळे त्याचा थेट परिणाम प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा दरावर होतो.व प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा दर कमी झाला तर रोपांची वाढ खुंटते. व प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा दर वाढला तर रोपांची शाखीय वाढ चांगल्या प्रकारे होते.
जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण
▸ टोमॅटो रोपांच्या वाढीच्या अवस्थेत नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, मॅग्नेशियम, कॅल्शियम व सल्फर या अन्नद्रव्यांची गरज असते. जमिनीमध्ये या अन्नद्रव्यांचे प्रमाण गरजे एवढे असेल तर रोपांची वाढ, रोपांची शाखीय वाढ, दोन फांद्यांमधील अंतर कमी, पानांची रुंदी व पानांचा पसरटपणा व पानांचा हिरवा रंग या घटकांची वाढ चांगल्या प्रकारे होते. व प्रमाण कमी असेल तर या घटकांच्या वाढीवर त्याचा थेट परिणाम होतो व रोपांची वाढ खुंटते.
पाऊस
▸ जर रोप वाढीच्या अवस्थेत पावसाचे प्रमाण जास्त असेल तर पावसामुळे, ओलाव्यामुळे बुरशीजन्य रोगांचा, जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. तसेच रोपांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रातील अन्नद्रव्ये वाहून जातात, ज्यामुळे रोपांची पाने पोपटी व पिवळी पडतात, हरितकणांचे प्रमाण कमी झाल्यामुळे बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांमुळे पाण्याच्या अंतर्गत वाहिन्यांचे जाळे विस्कळीत झाल्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा दर कमी होतो, व रोपांची वाढ खुंटते. व रोपे पिवळी पडणे यासारख्या अडचणी येतात.
ढगाळ वातावरण
▸ ढगाळ वातावरण सूर्यप्रकाशाची गुणवत्ता व सूर्यप्रकाशाचा दर कमी असतो, ज्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा दर कमी होतो. तसेच या वातावरणात नायट्रोजनचा पुरवठा जास्त झाल्यामुळे रोपांची सरळ वाढ होते, शाखीय वाढ होत नाही. या वातावरणात बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी राहतो ज्यामुळे रोपांची पाने पसरट व हिरवीगार होतात.
वरील सर्व अजैविक घटकांचा रोपांच्या वाढीवर सकारात्मक व नकारात्मक परिणाम होतो तो परिणाम लक्षात घेऊन वेळीच उपाययोजना केल्यास रोपांची वाढ व शाखीय विकास चांगल्या प्रकारे होतो.