उन्हाळी पावसाळी व हिवाळी हंगामात टोमॅटो लागवडीचे अंतर किती असावे?

Farmspot Agro
पावसाळी हंगाम  

▸ पावसाळी हंगामात सतत पाऊस पडत असतो, ज्यामुळे रोपे सतत ओली असतात, पानांवर पाणी साठवून राहते. ज्यामुळे बुरशीजन्य रोगांचा व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. तसेच या हंगामात रोपांची वाढ व शासकीय विकास चांगल्या प्रकारे होत असतो. ज्यामुळे या बुरशीजन्य रोगांचा प्रसार सुद्धा अधिक जलद गतीने होत असतो. यामुळे पावसाळी हंगामात दोन ओळींमधील अंतर 5 ते 6 फुट एवढे असावे व दोन रोपांमधील अंतर हे 1.5 फुट एवढे असावे, जेणेकरून सूर्यप्रकाशामुळे रोपांवरील पाणी  लवकर सुकले जाईल, हवा खेळती राहील, जेणेकरून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव व प्रसार कमी प्रमाणात होईल. जेवढी टोमॅटो रोपे जास्त काळ/वेळ सूर्यप्रकाशात असतात, तेवढी फुलांची संख्या जास्त असते व फळधारणा चांगल्या प्रकारे होत असते.

हिवाळी हंगाम  

▸ हिवाळी हंगामात सूर्यप्रकाशाचे प्रमाण व सूर्यप्रकाशाची गुणवत्ता कमी असते. तसेच आद्रता वाढल्यामुळे भुरी या रोगाचा प्रादुर्भाव व धुके पडल्यामुळे जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असतो. यामुळे हिवाळी हंगामात टोमॅटो लागवड करताना दोन ओळींमधील अंतर हे 5 फुट असावे व दोन रोपांमधील अंतर हे 1.25 फुट एवढे असावे. त्यामुळे दिवसाचा जास्तीत जास्त काळ टोमॅटो रोपे सूर्यप्रकाशात राहतील व प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेचा दर वाढेल, ज्यामुळे रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होईल. तसेच सतत हवा खेळती राहिल्यामुळे भुरी यासारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही. तसेच जास्त वेळ टोमॅटो रोपे सूर्यप्रकाशात असल्यामुळे फुलांची संख्या वाढते व फळधारणा चांगल्या प्रकारे होत असते.

उन्हाळी हंगाम   

▸ उन्हाळी हंगामात सूर्यप्रकाश जास्त वेळ व चांगल्या प्रतीचा असतो, परंतु या वातावरणात आद्रता मोठ्या प्रमाणावर वाढत असते, त्यामुळे भुरी या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असतो. त्यामुळे उन्हाळी हंगामात दोन ओळींमधील अंतर हे 1.25 फुट  ते 5 फुट  एवढे असावे व दोन रोपांमधील अंतर 1.25 फुट ते 1.5 फुट एवढे असावे.

अशा प्रकारे दोन ओळींमधील अंतर व दोन रोपांमधील अंतर हंगामानुसार करावे.  

Back to blog