टोमॅटो पिकामध्ये लागवडीपूर्वी माती परीक्षण करण्याचे महत्त्व व योग्य पद्धत.

Farmspot Agro
  • माती परिक्षणाचे महत्त्व,
  • माती परिक्षण करण्याची योग्य पद्धत 
माती परीक्षणाचे महत्त्व

✅शेतकरी हा वर्षानुवर्ष पारंपारिक शेती करतोय, त्यामध्ये कष्ट करतोय पण शेतकऱ्याला शेतीमधून समाधानकारक उत्पन्न भेटत नाही.पिकाच्या वाढीसाठी जेवढी पाण्याची गरज असते तेवढीच मातीची सुद्धा आवश्यकता असते. शेतातील मातीचे आरोग्य जर उत्तम असेल, तर त्या मातीमध्ये भरघोस उत्पन्न मिळते. तसेच जर मातीचे आरोग्य चांगले नसेल तर त्याचा विपरीत परिणाम पिकाच्या उत्पन्नावर होतो. त्यामुळे मातीमध्ये पिकाच्या वाढीसाठी व विकासासाठी आवश्यक अन्नद्रव्य घटक योग्य प्रमाणात आहेत का याची पडताळणी करणे काळाची गरज झाली आहे. यासाठी शेतातील मातीचे माती परीक्षण करणे गरजेचे आहे. माती परीक्षण म्हणजे पिकाच्या वाढीसाठी व विकासासाठी आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांची मात्रा जमिनीमध्ये किती प्रमाणात आहे हे रासायनिक पद्धतीने तपासून घेणे म्हणजेच माती परीक्षण करणे. माती परीक्षण केल्यामुळे मातीमधील सामुचे (pH) प्रमाण, क्षारतेचे प्रमाण (EC), सेंद्रिय कर्बाचे (OC) प्रमाण जमिनीमध्ये किती आहेत ते समजते, तसेच मातीमध्ये उपलब्ध असलेल्या पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांपैकी मातीतील नत्र (नायट्रोजन), स्फुरद (फॉस्फरस), पालाश (पोटॅश) यांचे प्रमाण मातीमध्ये किती आहे, तसेच मातीमध्ये उपलब्ध असलेल्या मॅग्नेशियम,कॅल्शियम, बोरॉन, लोह (फेरस), तांबे (कॉपर) यांसारख्या अन्नद्रव्यांची मात्रा किती आहे ते समजते. व त्यानुसार पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे अन्नद्रव्य मातीमध्ये किती प्रमाणात टाकावेत हे समजते.

माती परिक्षण करण्याची योग्य पद्धत

✅माती परीक्षण करण्यासाठी विशिष्ट पद्धतीने शेतातील मातीचा नमुना गोळा करावा लागतो आणि माती परीक्षण प्रयोगशाळेत (Soil Testing Lab) मधून तपासून घ्यावा लागतो.

मातीचा नमुना कुठून व कसा गोळा करावा?

✅मातीचा नमुना घेत असताना तो झाडाच्या सावलीतला घेऊ नये,पाटाच्या शेजारचा घेऊ नये,बांधाच्या शेजारचा घेऊ नये,ज्या ठिकाणी जनावरे बांधलेले असतात त्या ठिकाणचा सुद्धा मातीचा नमुना घेऊ नये, तसेच जेथे जमीन ओली असते अशा ठिकाणचा सुद्धा मातीचा नमुना गोळा करू नये, मातीचा नमुना गोळा करण्यासाठी शेतामध्ये नागमोडी पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी 7-8 खड्डे घ्यावेत आणि ते खड्डे घेत असताना खड्डे हे इंग्रजी V आकारामध्ये घ्यावेत, V आकारामध्ये खड्ड्यांची खोली ही 15-20 cm एवढी घ्यावी आणि त्यातूनच अर्धा किलो मातीचा नमुना गोळा करावा. खड्डा घेताना  लोखंडी औजारचा वापर करू नये,खड्डा घेण्यासाठी लाकडी औजारचा वापर करावा.त्या 7 ते 8 खड्ड्यांमधील माती एकत्रित मिक्स करावी,गोळा केलेली माती पॉलिथिनच्या तुकड्यावर पसरून घ्यावी.मातीत असणारे खडे आणि वनस्पतीची मुळे,मागील पिकांचे अवशेष काढून टाकावेत.त्यानंतर मातीच्या नमुन्याचे चार समान भाग करावेत व समोरासमोरचे दोन भाग काढून टाकावेत.अशी ही प्रक्रिया शेवटी अर्धा किलो माती उरेपर्यंत करावी. आणि हा मातीचा नमुना स्वच्छ कापडाच्या पिशवीत भरावा.व तो नमूना जवळच्या माती परीक्षण प्रयोगशाळेत (Soil Testing Lab) तपासणीसाठी द्यावा.


 

Back to blog