टोमॅटो रोपांची लागवड करताना कोणती काळजी घ्यावी? 

Farmspot Agro

टोमॅटो रोपांची लागवड करताना खालील काळजी घेणे गरजेचे आहे. 

✅टोमॅटो रोपांची लागवड हि शेत वाफस्यावर आल्यावर करावी,त्यासाठी लागवडीपूर्वी 2 ते 3 दिवस अगोदर पाणी द्यावे.ज्यामुळे लागवडी दिवशी शेत वाफस्यावर येईल.जर जास्त चिखलामध्ये रोपांची लागवड केली तर मजुरांच्या हाताला चिखल लागतो व तो चिखल पुन्हा खोडाला लागतो,ज्यामुळे त्या चिखलातून बुरशीचा प्रादुर्भाव जास्त होतो व रोप लागवडीनंतर रोपांची मर होते.
✅टोमॅटो रोपांची लागवड करताना कोणती काळजी घ्यावी?
टोमॅटो रोपांची लागवड करताना कोकोपीटच्या कपाचा जेवढा आकार आहे तेवढा खड्डा घ्यावा व त्यामध्ये रोपे ठेवून  माती लावून रोपे सपाट हाताने दाबून घ्यावीत, चिमटीने दाबू नयेत. जर चिमटीने दाबली तर त्या जागी रोपांना जखम होते व जखमेतून बुरशीचा प्रादुर्भाव होतो व रोपांची मर होते. जास्त खोल खड्डा घेऊ नये जास्त खोल खड्डा घेतल्यास रोपांच्या खोडाला सुद्धा माती लागते व त्या मातीतून जमिनीमध्ये असणाऱ्या पिथियम बुरशीचा प्राथमिक प्रादुर्भाव होतो व रोप लागवडीनंतर मर होते.
✅टोमॅटो रोपांची लागवड करण्यापूर्वी रोपांवर पाण्याचा फवारा मारून रोपांची लागवड करावी,जेणेकरून रोपे लागवड करताना व लागवडीनंतर जोपर्यंत पाणी देत नाही तोपर्यंत टवटवीत राहतात.
✅टोमॅटो ट्रे मधून रोपे काढताना व्यवस्थित काढावीत जेणेकरून रोपांचा कोकोपीटचा कप फुटणार नाही.जर फुटलेल्या कपातील रोपांची लागवड केली तर अशा रोपांची मर होऊ शकते.
✅रोप लागवड करताना रोपांच्या मुळांची कॉईल झाली असेल तर ती कॉईल काढून रोपांची लागवड करावी.जर कॉईल असलेल्या रोपांची लागवड केली तर पुढे जाऊन रोप वाढीच्या अवस्थेत रोपांची वाढ खुंटते व पानांच्या वाट्या होतात.
अशा प्रकारे रोपांची लागवड करताना काळजी घेणे गरजेचे आहे.


 

Back to blog