टोमॅटो रोप वाढीच्या अवस्थेत येणाऱ्या इतर अडचणी.
Farmspot AgroShare
टोमॅटो पिकाची रोप वाढीच्या अवस्था हि रोप लागवडीनंतर पहिले 15 दिवस ते 35 दिवसांच्या दरम्यान असते. या अवस्थेत खालील अडचणी येतात.
रोपांवर येणारा जैविक व अजैविक ताण
▸ रोप लागवडीनंतर 15 दिवसांनी तापमान, आद्रता, उष्णता यांसारख्या पर्यावरणीय घटकांमुळे रोपांवर अजैविक असा ताण येतो, तर किडी, बुरशीजन्य रोग यांच्या प्रादुर्भावामुळे रोपावर जैविक ताण येतो, ज्यामुळे रोपांच्या अंतर्गत प्रकाश संश्लेषण, श्वसन प्रक्रिया, वहन प्रक्रिया यांसारख्या असंख्य प्रक्रिया मंदावतात ज्याचा थेट परिणाम रोपांच्या वाढीवर व विकासावर होतो.
रोपांच्या दोन फांद्यांमधील अंतर वाढणे
▸ ज्यावेळेस रोपवाढीची अवस्था असते तेव्हा जर का नायट्रोजनचे प्रमाण वाढले तर रोपांच्या दोन फांद्यांमधील अंतर वाढते व त्याचा थेट परिणाम रोपांच्या फुलांच्या संख्येवर व शाखीय वाढीवर होतो. जर का दोन फांद्यांमधील अंतर जास्त असेल तर शाखीय वाढ कमी होते व फुलांची संख्या कमी असते. आणि जर का दोन फांद्यामधील अंतर कमी असेल तर शाखीय वाढ चांगली होते व फुलांची संख्या वाढते.
रोपांचे खोड पातळ राहणे
▸ ज्यावेळेस रोपवाढीची अवस्था चालू असते त्यावेळेस जर का खोड जाड झाले तर निघणारे फुटवे जाड निघतात व फांद्यासुद्धा जाड निघतात. ज्यामुळे फुलांची संख्या व गुणवत्ता चांगली असते. त्याउलट जर का खोड पातळ असेल तर निघणारे फुटवे व फांद्या जाड निघतात, फुटवे सुद्धा जास्त निघत नाही व फुलांची संख्या कमी मिळते. असंतुलित खत नियोजनामुळे खोड पातळ राहते.
पाने आकाराने लहान असणे व रंग पोपटी राहणे
▸ ज्यावेळेस रोप वाढीच्या अवस्थेत रोपांच्या पानाचा आकार लहान व रंग पोपटी असतो तेव्हा रोपांची प्रकाश संश्लेषण प्रक्रिया कमी होते व रोपांची वाढ थांबते. मॅग्नेशियम, नायट्रोजन व इतर अन्नद्रव्यांची कमतरता जाणवल्यामुळे रोपांच्या पानांचा आकार लहान राहतो व रंग फिकट हिरवा किंवा पोपटी होतो.
तापमानामुळे पानांच्या वाट्या होतात
▸ जेव्हा तापमान मोठ्या प्रमाणावर वाढतील तेव्हा बाष्पोत्सर्जन मोठ्या प्रमाणावर होते त्यामुळे टोमॅटोच्या कोवळ्या व शेंड्यांच्या पानांच्या वाट्या होतात किंवा पाने सुरकुतल्यागत होतात.
मुळांची कॉइल होणे
▸ जेव्हा जास्त वयाच्या रोपांची लागवड केली जाते तेव्हा काही कालावधीनंतर अशा रोपांच्या मुळांची कॉइल तयार होते व अन्नद्रव्य शोषण कमी प्रमाणात होते व रोपांच्या पानांच्या वाट्या होतात.