टोमॅटो रोपवाढीच्या अवस्थेत रोपांच्या वाढीवर परिणाम करणारे बुरशीजन्य रोग व ते काय परिणाम करतात?
Farmspot AgroShare
टोमॅटो रोपवाढीच्या अवस्थेत लवकर येणारा करपा, सेप्टोरिया काळे ठिपके, स्टेमफायलियम राखाडी ठिपके या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. ज्याचा थेट परिणाम रोपांच्या वाढीवर होतो.
▸ लवकर येणारा करपा
हा बुरशीजन्य रोग (Alternaria solani) या बुरशीमुळे होतो. ज्यामुळे रोपांच्या खालच्या पानांवर काळे डाग दिसतात. ज्याच्या बाजूने पिवळी प्रभावळ असते. ज्यामुळे पाने पिवळी पडतात, जळुन जातात व पानांच्या अंतर्गत वाहिन्या विस्कळीत होतात. ज्याचा थेट परिणाम प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया व अन्नद्रव्य वहनावर होतो, ज्यामुळे रोपांची वाढ खुंटते. अन्नद्रव्ये पुरवठा न झाल्यामुळे रोपांची शाखीय वाढ होत नाही. तसेच वनस्पतींच्या पानांना जखमा झाल्यामुळे इतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो.
▸ सेप्टोरिया काळे ठिपके
हा बुरशीजन्य रोग (Septoria lycoperisici )या बुरशीमुळे होतो. जेव्हा रोपांच्या खालील पानांवर ओलसर माती उडते, त्या मातीमधून या बुरशीचे बीजाणू पानांवर अंकुरतात. ज्यामुळे पानांवर काळ्या रंगाचे ठिपके दिसतात प्रादुर्भाव वाढल्यानंतर ठिपक्यांचे प्रमाण व आकार वाढतो. ज्यामुळे पानांमध्ये हरितकणांचे प्रमाण कमी होते व पानांच्या अंतर्गत अन्नद्रव्यांचे वाहिन्या विस्कळीत होतात. ज्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेचा वेग कमी होतो व अन्नद्रव्य वहन विस्कळीत होते. ज्यामुळे रोपांची वाढ खुंटते, तसेच पानांवर जखमांमधून इतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
▸ स्टेमफायलियम राखाडी ठिपके
हा बुरशीजन्य रोग ( Stemphyllium Solani )या बुरशीमुळे होतो. ज्यामध्ये रोपांच्या वरच्या भागातील पानांवर राखाडी रंगाचे ठिपके दिसतात, प्रादुर्भाव वाढेल तसे ठिपक्यांचे प्रमाण वाढते. ज्यामुळे वनस्पतींमधील हरितकणांचे प्रमाण कमी होते व अन्नद्रव्य वहन करणाऱ्या वाहिन्या विस्कळीत होतात. ज्याचा थेट परिणाम प्रकाश संश्लेषण प्रक्रियेच्या दरावर व अन्नद्रव्यांच्या वहनावर होतो. परिणाम रोपांची वाढ खुंटते, तसेच पानांना जखमा झाल्यामुळे बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
टोमॅटो रोप वाढीच्या अवस्थेत या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे त्याचा थेट परिणाम रोपांच्या वाढीवर होतो. त्यामुळे प्राथमिक प्रादुर्भाव झाल्यानंतर लगेच उपाययोजना कराव्यात.