टोमॅटो रोप रुजण्यावर परिणाम करणारे अजैविक घटक

Farmspot Agro

टोमॅटो रोप रुजण्याच्या अवस्थेत रोपांच्या मुळांची वाढ होणे हा प्रमुख विकास रोप करत असते. या मुळांच्या वाढीवर परिणाम करणारे अजैविक घटक खालील प्रमाणे:

मातीची गुणवत्ता 

▸ मातीची संरचना, मातीचे भौतिक गुणधर्म, जमिनीचा PH व जमिनीमधील अन्नद्रव्याचे प्रमाण हे मुळांच्या वाढीवर परिणाम करणारे प्रमुख घटक आहेत.
▸ जर जाड माती (काळवट, तांबट, गाळाची माती) असेल तर अशा माती पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. परंतु निचरा कमी होतो. अशा मातीत मुळांची वाढ ही मध्यम स्वरूपाची असते. या मातीत रोपे सेट होण्यासाठी 5 ते 6 दिवस लागतात.
▸ मध्यम जाड माती(तांबट, तांबट- काळी) या मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता मध्यम असते व निचरा पण मध्यम स्वरूपाचा होतो. ज्यामुळे अशा मातीत पांढऱ्या मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते व रोपे 3 ते 4 दिवसांत सेट होतात.
▸ हलक्या मातीत (मुरमाड, वाळूसार) पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते व निचरा जास्त होतो. अशा मातीत पांढऱ्या मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते, परंतु ओलावा कमी झाला की रोपांची वाढ खुंटते. अशा मातीत ओलावा असेल तर लागवडीनंतर 3 ते 4  दिवसात रोपे सेट होतात.
▸ ज्या मातीचा PH हा 6 पेक्षा कमी व 7 पेक्षा जास्त आहे अशा मातीत रोपांची वाढ कमी प्रमाणात होते व ज्या मातीचा PH 6.0 ते 6.8 आहे अशा मातीत रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होते.

पाण्याची उपलब्धता

▸ मुळांच्या  वाढीसाठी पुरेसा पाणीपुरवठा आवश्यक आहे. शेतामध्ये जास्त प्रमाणात पाणी साठत असेल व निचरा कमी होत असेल तर त्या जमिनीत रोपांची वाढ कमी प्रमाणात होते व रोपे लवकर सेट होत नाही. तसेच जमिनीत ओलावा कमी असल्यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ म्हणावी अशी होत नाही. अशा परिस्थितीत रोपे सुकून जाण्याचे प्रमाण जास्त असते.
▸ या परिस्थितीमध्ये पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत टोमॅटो लागवड करा व पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करा. जेणेकरून माती जास्तीत जास्त काळ वाफस्यावर राहील.
▸ तर पाणी कमी असणाऱ्या क्षेत्रात टोमॅटो लागवड करत असाल तर ठिबकचा वापर करा व ड्रीपवर टोमॅटो रोपे लावा. 

तापमान 

▸ मुळांच्या वाढीमध्ये विकासामध्ये तापमान महत्त्वाची भूमिका बजावते. तापमान जास्त असेल तर रोपांवर ताण येतो.त्याचा थेट परिणाम रोपांच्या अंतर्गत प्रक्रियांवर पडतो व मुळांची वाढ थांबते आणि कार्यक्षमता कमी होते.
▸ ज्या भागात तापमान 38०C पेक्षा जास्त आहे अशा भागात रोपे सेट होण्यासाठी 8 ते 10 दिवस एवढा वेळ लागतो. तसेच तापमान कमी असेल तर मुळांच्या अन्नद्रव्ये  शोषणावर व रोपांच्या चयापचय प्रक्रियेवर त्याचा थेट  परिणाम होतो, ज्यामुळे थंडीच्या दिवसात सुरुवातीच्या 5  दिवसात रोपे सेट होतात परंतु वाढ होत नाही.

सूर्यप्रकाश  

▸ सूर्यप्रकाशाचे प्रमाण व गुणवत्ता  हे रोपांच्या वाढीवर व मुळांच्या  विकासावर थेट परिणाम करते. सूर्यप्रकाशाचे प्रमाण वाढले तर पानांद्वारे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होते. ज्याचा थेट परिणाम मुळांच्या  कार्यक्षमतेवर होतो. परिणामी पानांच्या वाट्या होऊन रोपांची वाढ खुंटते.
▸ त्याउलट सूर्यप्रकाशाचे प्रमाण व गुणवत्ता चांगली असेल तर प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया चांगल्या प्रकारे होते व रोपांची वाढ व विकास होतो.

जमिनीमधील हवेचे परिसचन व ऑक्सिजनचे प्रमाण

▸ ज्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा कमी होतो पाण्याचे प्रमाण जास्त असते, अशा जमिनीमध्ये दोन मातीच्या कणांमध्ये  हवेचे प्रमाण कमी असते व मुळांच्या  कार्यक्षेत्रात ऑक्सिजनची  उपलब्धता कमी असते, ज्यामुळे अन्नद्रव्य उपलब्धता व शोषण कमी होते. परिणामी जाड मातीत रोपांची पांढऱ्या मुळांची वाढ  कमी प्रमाणात होते व रोपे सेट होण्यास वेळ लागतो.

जमिनीची क्षारता

▸ जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त असेल तर मुळांची वाढ होत नाही व मुळांद्वारे अन्नद्रव्ये शोषण केले जात नाही, परिणामी रोपे सेट झालेली असताना रोपांची वाढ होत नाही .

वरील सर्व अजैविक घटक रोपांच्या रुजण्याच्या अवस्थेत रोपांच्या वाढीवर परिणाम करतात.  

Back to blog