आले शेती टिप्स: आले लागवडीपूर्वी आले/अद्रक सुकवणे/देणे याविषयी सर्व माहिती
Farmspot AgroShare
आले/अद्रक लागवडीपूर्वी कंद किती दिवस सुकवावा?
आले/अद्रक लागवडीपूर्वी कंद सर्वसाधारण ३० ते ४० दिवस सुकवणे गरजेचे आहे. या प्रक्रियेस 'बेणे क्युरिंग प्रक्रिया' किंवा बियाणे विश्रांती प्रक्रिया असे म्हणतात.
आले/अद्रक सुकवल्यामुळे काय फायदे होतात?
- आल्याचे कंद जमिनीतून काढताना किंवा त्यांचे तुकडे करताना त्यांना जखमा होतात. जर ओले किंवा ताजे कापलेले कंद लगेच लावले, तर मातीतील बुरशी (उदा. सड किंवा कुज रोग निर्माण करणारी बुरशी) त्या जखमांतून कंदावर हल्ला करते आणि कंद सडून जातो. सुकवल्यामुळे जखमा सुकतात आणि कंद बियाणे सुरक्षित होते.
- आले बियाणे जमिनीमधून काढून जमिनीमध्ये लागवड केल्यास ५० ते ७० दिवसांचा कालावधी लागतो. या कालावधीत आले/अद्रक बेणे जमिनीत राहिल्यास त्या बेण्यास/बियाण्यास बुरशीचा प्रादुर्भाव होऊन त्याची कंदकुज होऊ शकते. म्हणून आलेबियाणे लागवडी पूर्वी सुकवणे गरजेचे आहे, जेणेकरून कंदकुज होणार नाही.
- आले व अद्रक कंद लागवडीपूर्वी सुकवला नाही तर कंद लागवड केल्यानंतर न सुकवलेला कंदामधील पाणी व जमिनीचे तापमान यामुळे कंद जमिनीतच सडतो व खराब होतो. त्याउलट कंद सुकवून लावल्यास त्यातील पाण्याचे प्रमाण कमी झालेले असते व ज्यामुळे कंद उष्णता/तापमान सहन करू शकतो व कंद खराब होत नाही.
- आले व अद्रक लागवडीपूर्वी कंद सुकवल्यास कंदाची बाहेरील साल कडक व घट्ट होते. त्यामुळे कंद लागवड केल्यामुळे त्या कंदास जमिनीमधील बुरशीचा प्रादुर्भाव होत नाही.
- आले/अद्रक ३० ते ४० दिवस सुकवल्यामुळे त्या कंदातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि कंदाचे डोळे फुगून वर येतात (कंद मोगरतात), ज्यामुळे जमिनीत लावल्यानंतर एकसारखी उगवण होते.
- आले/अद्रक लागवडीअगोदर ३० ते ४० दिवस सुकवल्यामुळे कंद काढताना कंदास झालेल्या सर्व बारीक जखमा सुकतात व पुढे जाऊन लागवडीनंतर कंद कुज / रायझोम कंदकुज होत नाही.
- आले, अद्रक लागवडीअगोदर ३० ते ४० दिवस सुकवल्यामुळे अगोदरच कंदास आतून बुरशीचा किंवा किडीचा प्रादुर्भाव झाला असेल तर तो कंद या विश्रांतीच्या काळात खराब होऊन जातो व आपणास लागवडीनंतर होणारे नुकसान टळते.
कंद सुकवण्याची प्रक्रिया कशाप्रकारे केली जाते?
आले/बियाणे शेतातून आणल्यानंतर त्याची सर्व माती हाताने काढून सावलीमध्ये, सूर्यप्रकाशापासून लांब एकसारखे पसरले जाते. पसरताना ते अशा प्रकारे पसरले जाते जेणेकरून हवा खेळती राहील.
कंद सुकवताना कोणती काळजी घ्यावी?
- कंद सुकवताना कंद सूर्यप्रकाशापासून लांब सावलीत सुकवावा.
- कंदास पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी.
- कंद सुकवताना हवा खेळती राहील अशा प्रकारे सुकवावा. जर हवा खेळती राहिली नाही तर आर्द्रता वाढेल व बुरशीचा प्रादुर्भाव होऊन कंदकुज होऊ शकते.
- कंद सुकवायला टाकताना थोडी बीएशि (BHC / बुरशीनाशक) पावडर टाकावी.
- कंद सुकवत असताना ५ ते ६ दिवसांतून एकदा निरीक्षण करावे जेणेकरून कंद खराब होत नाही याची खात्री होईल.
अशा प्रकारे सातारा व सांगली भागातील शेतकऱ्यांचा हा ३० दिवसांचा आले सुकवण्याचा फॉर्म्युला म्हणजे आल्याला "क्वारंटाईन" करून त्याला मजबूत बनवण्याची आणि रोगमुक्त शेतीची एक उत्तम यशस्वी पद्धत आहे!